राजगुरूनगरमधील घटना : वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवल्याचा आला राग
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वडिलांनी वृद्धापकाळात स्वत:च्या लग्नासाठी वधू-वर सुचक मंडळात नाव नोंदवल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्या बापाचा गळा चिरुन खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. ही घटना राजगुरुनगर (जि. पुणे) शहरात गुरुवारी (दि. 6) सायंकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शंकर रामभाऊ बोऱ्हाडे (वय-80 रा. नंदादीप हौसिंग सोसायटी, वैशंपायन आळी, राजगुरुनगर, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शेखर शंकर बोऱ्हाडे (वय-47) असे खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या वृद्ध वडिलांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने याबाबत समाजात समजले तर आपली बदनामी होईल. तसेच प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार होईल या रागात मुलानं वडिलांच्या गळ्यावर कांदा कापण्याची सुरी फिरवली. बोथट सुरीने गळा कापेना म्हणून त्याने दगडी वरंवटा तोंडावर, डोक्यात मारुन वडिलांचा खून केला. यानंतर मुलाने स्वत: खेड पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, माझे वडील शंकर बोऱ्हाडे यांनी परस्पर वधू-वर सुचक मंडळात पैसे भरुन स्वत:च्या लग्नाची नोंदणी केली. नोंदणी करुनही ते माझ्यासोबत खोटं बोलले. याचा राग मला अनावर झाल्याने मी किचन मधून कांदा कापण्याची सुरी आणून वडिलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. म्हणून मी घरात असलेल्या दगडी वरवंट्याने तोंडावर आणि डोक्यात मारुन त्यांचा खून केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव करीत आहेत.