सिंहगड रोड पोलिसांत तक्रार : कात्रज-नवले ब्रिज रोडवर झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मोटारसायकलवरील एकीचा कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू, तर सहप्रवासी जखमी झाला. कात्रजकडून नवले ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
पूजा निलेश कांबळे (वय ३०, रा. संगम रेसिडेन्सी, वडगाव बु।।, पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, तिचा मित्र विनोद कदम जखमी झाला आहे. याप्रकरणी गणेश पटेल (वय ३१, रा. वडगाव बु।।, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कात्रजकडून नवले ब्रिजकडे फिर्यादीची बहिण व तिचा मित्र दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कंटेनरचा मोटारसायकलला धक्का लागल्याने विनोद डाव्या बाजूला पडला, तर पूजा उजव्या बाजूला पडल्याने तिच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेले. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला, तर विनोद जखमी झाला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करीत आहेत.
















