चालकासह चार जखमी; दैव बलवत्तर म्हणून बचावलो प्रवाशांची भावना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे-सातारा महामार्गावर जुन्या कात्रज घाटातील भिलारेवाडी येथे तीव्र वळणावर पहाटेच्या सुमारास १९ प्रवाशांना घेऊन जाणारी कर्नाटक पासिंगची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून गंभीर अपघात घडला. यामध्ये चालकासह चार जण जखमी झाले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील हुबळी ते शिर्डीकडे जाणारी बस केए २५ एफ ३२४८ ही मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास भिलारेवाडी येथील के ७२ हॉटेल शेजारी असलेल्या तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीस फूट खाली खड्ड्यात कोसळली. या अपघातामध्ये बसची पलटी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालकासह चार प्रवाशी जखमी झाले असून स्थानिक नागरिक, भारती विद्यापीठ पोलिसांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे व कर्मचारी यांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक दलाने तात्काळ पोहचत बस चालकाला सुखरूप बाहेर काढले. पुढील तपास भारती विद्यपीठ पोलीस करत आहेत.
