घोडेगाव तहसीलसमोर कारवाई : जमीनीचा फेरफार मंजुरीसाठी मागितले पैसे
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना घोडेगाव येथील मंडल अधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई घोडेगाव तहसील कार्यालयासमोर केली.
मंडल अधिकारी योगेश रतन पाडळे (वय-38), खासगी इसम लक्ष्मण सखाराम खरात (वय-61) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 36 वर्षीय नागरिकाने तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाने जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी योगेश पाडळे याने दहा हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोडेगाव तहसील कार्यालयासमोर सापळा रचला. तहसील कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये मंगळवारी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पाडळे याला पकडण्यात आले. लक्ष्मण गायकवाड याने लाचेची मागणीस सहाय्य केले. म्हणून दोघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करीत आहेत.
