बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : सुखसागरनगरमध्ये सापळा रचून घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खून केल्यानंतर चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईताला बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुखसागरनगरमधील आंबा माता मंदिराजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर वाहनचोर व इतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहेत.
कुणाल ऊर्फ मॉन्टी कालेकर (रा. व्ही.आय.टी. कॉलेज, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, खुनाच्या गुन्ह्यातील दीपक ऊर्फ डी. उत्तम डाखोरे, शहाबुद्दीन निजामुद्दीन मुल्ला, गणराज सुनील ठकार, या आरोपींना अगोदरच अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, खुनातील फरार आरोपी सुखसागरनगरमधील आंबा मंदिराजवळ आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केले. आरोपी शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असून, बिबवेवाडी पोलीस स्टेशनमधील वाहनचोरीच्या गुन्ह्यात चार महिन्यांपासून फरार आहे. आरोपीविरुद्ध इतर पोलीस स्टेशनमध्येही गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे, पोलीस शिपाई अनिल डोळसे, शिवाजी येवले, दैवत शेडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.














