सहकारनगर पोलिसांत फिर्याद : धनकवडी-तळजाई पठारमधील भंगार गोडावूनमध्ये घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लोखंडी सत्तूरने तोंडावर व डोक्यात वार करून जखमी करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. धनकवडीतील तळजाई पठार येथील गोडावूनमध्ये २० जानेवारी २०२२ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
पलूराम यादव (वय ५२) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिल साळुंके (वय ३२, रा. चव्हाणनगर, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पलूराम यादव हा भंगार मालाची चौकशी करण्याकरिता गोडावूनमध्ये आला, त्यावेळी अशोक पवार याने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी पलूरामने त्याला ३० रुपये दिले. त्यानंतर पुन्हा त्याने पैसे मागितले मात्र, त्याने पैसे न दिल्याने दोघांमध्ये झटापटी झाली. यावेळी अशोक पवार याने लोखंडी सत्तूरने पलूराम यादवच्या डोक्यात व तोंडावर वार केल्याने पलूराम जखमी झाला. सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षिका स्वाती देसाई पुढील तपास करीत आहेत.
