शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : पोलीस आणि कस्टम अधिकारी असल्याचे सांगून केल्या चोऱ्या
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय स्तरावर हरियाणा, दिल्ली येथे पोलीस असल्याचे सांगून २२ गुन्ह्यातील फरारी आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले. शिवाजीनगरमधील इराणीवस्तीमध्ये सापळा रचून आरोपीला शिताफीने पकडले.
जाफर अलिखान ईराणी (वय ३०, रा. ईराणीवस्ती, शिवाजीनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, हरियाणा येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगरमध्ये लपून बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ईराणीवस्ती येथे धाव घेत सापळा लावला. मात्र, स्थानिकांसह कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरडा करीत पोलिसांना विरोध करून आरोपीला पळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपी पळून जात असताना पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून पकडले. आरोपीचे क्राईम रेकॉर्ड तपासून खात्री केली असता हरियाणातील हिरास पोलीस स्टेशनमध्ये कस्टम अधिकारी असल्याचे सांगून ४५ लाख रुपयांचे एक किलो सोन्याची चोरी केल्याचे उघडकीस आले. हरियाणा व दिल्लीमध्ये २२ गुन्ह्यात फरार असल्याची माहिती समोर आली. लुधियाना डिव्हिजन नं.१ (कोतवाली) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ३६ तोळे सोने पोलीस असल्याचे सांगून चोरी केल्याचे उघडकीस आले. आरोपीला पुढील तपासासाठी अहमदनगरमधील श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका अनिता मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, विजय पानकर, विनोद महांगडे, पोलीस हवालदार बशीर सय्यद, पोलीस नाईक इनामदार आणि अनिकेत भिंगारे, राहुल होळकर, अविनाश पुंडे, ज्ञानेश माने, अमोल कोल्हे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
