न्यायालयाचा आदेश : पांडवनगरमध्ये कोयत्याने वार केल्याची घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पांडवनगर येथे घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींना (शुक्रवार, दि. २८ जानेवारी २०२२) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सलीम जावेद शेख असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विजय चंद्रकांत विटकर (वय-19), मयूर सुनील विटकर (वय-21), अतुल अनिल धोत्रे (वय-23), सागर विनायक मंगळवेढेकर, प्रणव अर्जुन झडपे (वय22 सर्व रा. वडारवाडी), साहील विटकर आणि आकाश ओरसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अली जावेद शेख (वय-23 रा. वडारवाडी, पुणे) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी मयुर विटकर याचे वकील प्रसाद निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी आरोपी हे क्रिकेटच्या मैदानावर होते. तर एकजण हा त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता. फिर्यादी यांनी पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरुन आरोपींची नावे घेतली असल्याचा युक्तिवाद केला. ॲड. प्रसाद निकम यांना कामकाजामध्ये ॲड. तन्मय देव, ॲड. मन्सूर तांबोळी आणि ॲड. ऋषीकेश सुभेदार यांनी मदत केली.
विजय विटकर आणि जखमी सलीम यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी रात्री फिर्यादी यांचा भाऊ सलीम व त्याचे मित्र शुभम दुबळे, मानव शेलार हे उत्तरादेवी जिमसमोर शेकोटी करुन गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी विजय विटकर हा आपल्या साथिदारांसह त्याठिकाणी आला. विजय विटकर याने सलीमला ‘तुला लय माज आला आहे, तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत त्याचा शर्ट पकडून शिवीगाळ करुन हातातील लोखंडी कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच इतर साथिदारांनी लोखंडी रॉड व बांबूने मारहाण केली. सलीम याचे मित्र शुभम आणि मानव हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच ‘आमच्या भांडणात पडलात तर कोणालाच जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी परिसरात दहशत निर्माण करुन जोरजोरात ओरडत निघून गेले.
