हडपसर पोलिसांत फिर्याद : मारहाण करून लोखंडी हत्याराची दाखविली भीती
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे ः लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत लोखंडी हत्याराची भीती दाखवत रोख २०० रुपये आणि मोबाईल असा एकूण १५ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेणाऱ्या चौघा अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. मंतरवाडी चौक-हांडेवाडी रस्त्यावर ३ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
प्रथमेश काळे (वय २१, रा. फुरसुंगी, ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मंतरवाडी चौक-हांडेवाडी रस्त्याने घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अनोळखींनी लिफ्ट देऊन पुढे नेले. साथीदारांच्या मदतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत लोखंडी हत्यार घेऊन अंगावर येऊन जीवे मारण्याची धमकी देत खिशातील २०० रुपये रोख आणि मोबाईल असा एकूण १५ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात पुढील तपास करीत आहेत.
