विमानतळ पोलिसांत फिर्याद : चंदननगर परिसरातील घटनेने प्रचंड खळबळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बोलत नाही आणि भेटत नसल्याच्या रागातून तरुणाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात गळा दाबून तिच्यावर चाकूने सपासप वार करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना चंदननगरमधील पुणे-नगर रोडवरील खुळेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली.
ज्ञानेश्वर राजेंद्र निंबाळकर (वय २२, रा. बेंद्रे बिल्डींग, चंदननगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका १७ वर्षांच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या चंदननगर येथे राहणाऱ्या आहेत. आरोपी त्यांना ओळखतो. त्या आरोपीशी बोलत नाही. त्याला भेटत नाही, याचा राग होता. फिर्यादी या शुक्रवारी दुपारी पायी घरी जात असताना खुळेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर आरोपीने फिर्यादीला अडवले. तिचा गळा दाबून स्वत: कडे असलेल्या चाकूने तिच्या पाठीत, छातीवर, पोटावर व पायावर सपासप वार करुन तिला जखमी केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करुन या तरुणाला पकडले. पोलिसांनी त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
