न्यायालयाचा आदेश : कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा निकाल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परताना देण्याच्या आमिषाने पुण्यातील अनेकांना कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणाऱ्या एम.जी. एंटरप्रायझेसच्या अलनेश अकील सोमजीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अलनेश सोमजी आणि पत्नी डिंपल सोमजी यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमजी दाम्पत्य हे देशाबाहेर पळून जाऊ नयेत, म्हणून पुणे पोलिसांनी दि. 29 ऑक्टोबर रोजी त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. दरम्यान, पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक–2च्या टीमने सोम जी दाम्पत्यास दिल्ली विमानतळावरून अटक केली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने दोघांना देखील पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर अलनेश सोमजीची रवानगी येरवडा कारागृहात झाली.
दरम्यान, अलनेश सोमजीने जामीन मिळावा म्हणून न्यायालयात वकिलामार्फत अर्ज केला होता. न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. जामीन अर्जास सरकारी वकिल मारूती वाडेकर तसेच तक्रारदार ऋत्विक संघवी, शैलेंद्र संघवी, माया चावला, किरण शेट्टी आणि निझार मेवानी यांचे अनुक्रमे वकिल अॅड. सुधीर शहा, अॅड. राहुल देशमुख, अॅड. ऋषिकेश घोरपडे आणि अॅड. प्रसाद कुलकर्णी यांनी कडाडून विरोध केला. अखेर न्यायालयाने अलनेश सोमजीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
















