खेड तालुक्यातील घटना : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात तरुणाचा खून
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तरुणाचा खून करुन मृतदेह दरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना खेड (जि. पुणे) तालुक्यात उघडकीस आली आहे. पुणे–नाशिक महामार्गावर खेड घाटात तरुणाचा खून करुन मृतदेह दरीत फेकून दिला. हा खून कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
स्वप्नील सखाराम चौधरी (वय – 25 आंबेओहळ, खरपुडी बुद्रुक, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे – नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात चौधरी याचा सोमवारी (दि.21) रात्रीच्या सुमारास खून झाला. चौधरी याला दारु पाजून खून करुन मृतदेह महामार्गालगत असणाऱ्या खोल दरीत टाकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव,
महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. तरुणाच्या डोक्यात मानेवर धारदार हत्याराने वार करुन खून करण्यात आला आहे.
खेड उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले की, खून झालेला तरुण खेड तालुक्यातील खरपुडी येथील असून, त्याला खेड घाटात कोणी आणले? व तो येथे का आला होता? कशासाठी आला होता? आणि त्याचा खून कोणी केला? याबाबतचा तपास सुरु आहे. तसेच लवकरच आरोपींना अटक केली जाईल.
