गुन्हे शाखा युनिट-४ची कारवाई : आव्हाळवाडी येथील रिलायन्स फ्रेश मॉलसमोर घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयत्याने प्राणघातक हल्ला करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने अटक केली. आव्हाळवाडी येथील रिलायन्स फ्रेश मॉलजवळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील वॉटर बे सोसायटीच्या ग्राऊंडवर सईद जाकीर शेख (रा. वडगावशेरी, पुणे) याच्यावर खून करणारे आरोपी आव्हाळवाडीतील मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आदिल सय्यद, अतिश डिंगरे व त्याच्या साथीदारांना पकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला. आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
आदिल इफ्तेकार सय्यद (रा. वडगावशेरी, पुणे), रोहित राजू धाडवे (रा. येरवडा, पुणे), जय राजू साळवे (रा. वडगावशेरी, नगररोड, पुणे), दुर्गेश ऊर्फ संकेत थेऊरकर (रा. मांजरी बु।।, पुणे), अतिश उमेश डिंगरे (रा. धानोरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायु्क्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पवार, पोलीस अंमलदार राजस शेख, नागेशसिंग कुंवर, दीपक भुजबळ, संजय आढारी, दत्तात्रय फुलसुंदर, कौस्तुभ जाधव, सागर वाघमारे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
