टीईटी गैरव्यवहार प्रकरण : पुणे सायबर पोलिसांनी केली मोठी कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. राज्य परीक्षा परीषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे याने इतरांसोबत संगनमत करुन निकाल लागल्यावर अनेकांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांना पास केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 2019 – 20 ची 400 आणि 2018 च्या परिक्षेतील 250 अशी एकूण 650 बनावट प्रमाणपत्र जप्त केली आहेत. तुकाराम सुपे याने यासर्वांना बनावट प्रमाणपत्र देऊन परीक्षा मध्ये पास झाल्याचे दाखवले होते.
टीईटी परीक्षेमध्ये तुकाराम सुपे, डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विनकुमार यांनी एजंटांना हाताशी धरुन हजारो अपात्र परीक्षार्थींकडून कोट्यावधी रुपये घेऊन त्यांना पात्र करुन घेतले. मुळ निकालामध्ये त्यांची नावे समाविष्ट केली. एवढेच नाही तर निकाल लावल्यानंतर सुपे याच्याकडे आलेल्या यादीतील परीक्षार्थींना पात्र ठरवून त्यांना बनावट प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. तसेच अनेकांना त्यांची बनावट प्रमाणपत्रांची फोटो कॉपी काढून पोस्टांनी पाठवून दिल्याचे समोर आले आहे.
बोगस प्रमाणपत्राबाबत सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात 45 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच 203 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा मिळाला आहे. तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व एजंटांकडून 81 बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. जी ए सॉफ्टवेअर जप्त डिजिटल पुराव्याची पडताळणी सध्या सुरु आहे.
पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, टीईटी परीक्षेत आरोपींनी परीक्षेचा निकाल लावल्यानंतर अनेक अपात्र परीक्षार्थींना बनावट प्रमाणपत्र दिली आहेत. शिक्षण विभागाने सर्वांकडून ही प्रमाणपत्रे मागवली आहेत.
आजपर्यंत 650 जणांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तपासात समोर आले असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
















