हडपसर पोलिसांत फिर्याद : भांडणाच्या रागाचा बदला घेण्यासाठी केले कृत्य
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला नडला तर त्याला सोडणार नाही, असे म्हणत कोयता व बांबू हवेत फिरविणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. हडपसर-माळवाडीमध्ये २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.
ओम ऊर्फ पिंट्या भंडारी (वय २१, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे), नितीन सुंदर दहिरे (वय २३, रा. हिंगणेमळा, हडपसर) आणि राजन रघुनाथ लावड (वय २०, रा. यश हॉस्पिटलसमोर, माळवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी सोमनाथ जाधव (वय २३, रा हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्याचे मित्र हडपसर-माळवाडी येथे थांबले होते. त्यावेळी आरोपींनी भांडणाचा बदला घेण्यासाठी मोबाईल मागितला. फिर्यादीने मोबाईल दिला नाही म्हणून लाथाबुक्क्या आणि हाताने आणि बांबू-कोयत्याने मारहाण करीत कोयते व बांबू हवेत फिरवत आम्ही इथले भाई आहोत, कोणी आम्हाला नडला, तर आम्ही त्याला सोडणार नाही, असा आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. त्यामुळे आसपासचे नागरिक घाबरून पळून गेले. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.
