गुन्हे शाखेच्या युनिट ४ची कामगिरी : साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे स्टेशनला जाण्यासाठी येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात थांबलेल्या एका व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून चौघांनी त्याचे अपहरण करून मारहाण व लुबाडणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पथकाने तिघांना अटक केली असून सुमारे ७ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये राहुल किसन सावंत (वय १९, रा. समर्थनगर, खराडी, मुळ रा. आंबेजोगाई, जि. बीड), निशांत झुंबर बागुल (वय २१, रा. चिखलठाण, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि
महेश रामकिशन सोनटक्के (वय २०, रा. खांदवेनगर, गीताई पार्क, लोहगाव) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून फिर्यादीचा चोरलेला मोबाईल, आरोपींचे तीन मोबाईल फोन, गुन्ह्यासाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार तसेच लोखंडी कोयता असा एकूण ७ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रेमजी पाटीदार (वय ४२, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) हे ३० जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर चौकात थांबले होते. त्या वेळी पांढऱ्या रंगाच्या डिझायर कारमधील आरोपींनी त्यांना पुणे स्टेशनला सोडतो असे सांगून गाडीत बसवले. पुढे त्यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईलवरील गुगल पेद्वारे १८ हजार ८०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
दरम्यान, गुन्हे शाखेचे युनिट ४चे पथक चंदननगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ही टोळी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह खराडी येथील हॉटेल जत्रा येथे बसलेली आहे.
माहितीची खात्री करून पोलिसांनी सापळा रचत तेथे धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होते; मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलीस फौजदार हरीश मोरे, एकनाथ जोशी तसेच पोलीस अंमलदार प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, नागेश सिंगकुंवर, शरद झांजरे, वैभव रणपिसे, विशाल इथापे, रोहिणी पांढरकर आणि मयुरी नलावडे यांनी ही कामगिरी पार पाडली.















