रस्ता सुरक्षा अभियान, ४० टक्के अपघात कमी करण्याचा निर्धार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांची सोमवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शाळा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत या तळीरामांना सज्जड दम दिला. यापुढे मद्यप्राशन करून वाहन चालविणे लक्षात राहील, अशी कारवाई करण्याचा इशारा दिला.
रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार बोलत होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेले १ हजारांहून अधिक वाहनचालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, शहरात यापुढे कोणीही मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, अशी आमची भूमिका आहे. तुम्ही मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने अपघात घडतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर त्याचे परिणाम होतात, याची कल्पना असावी.
अशा वाहनचालकांवर कायम लक्षात राहील अशी कारवाई पोलीस करतील. त्यांची वाहने जप्त करू, तसेच त्यांचे मित्र व कुटुंबीय यांच्या देखत चौकात त्यांचा सत्कार करू. पोलिसांच्या संकेतस्थळावरही त्यांचे फोटो प्रसिद्ध करू. यापुढेही पोलीस सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, शिक्षा देणे हा उद्देश नाही. मात्र, वाहतूक नियमांचे पालन न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. येथे जमलेले सर्वजण समुपदेशन कार्यक्रमानंतर समाजात मेसेंजर म्हणून काम करतील.
प्रत्येक आठवड्याला तळीरामांची शाळा – पोलिसांकडून प्रत्येक आठवड्याला पोलीस मुख्यालयात तळीरामांची शाळा घेण्यात येणार आहे. कारवाई झालेल्यांना या समुपदेशन शिबिराला हजर राहावेच लागणार आहे. तसेच रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची वाहने जप्त करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या.
जड वाहनांमुळे होतात अपघात – पुण्यात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ३० टक्के अपघात हे अवजड वाहनांमुळे होतात. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीत या अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तसेच त्यांच्या मालकांवरही जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात अपघाताचे गुन्हे दाखल असलेल्या सर्व अवजड वाहनांचे चालक व त्यांच्या मालकांचीही समुपदेशन शाळा पोलीस घेणार आहेत, असे अमितेशकुमार यांनी सांगितले.
किर्तनकार म्हणाले, साहेब मी दारू पित नाही – साहेब, मी दारू पिली नव्हती. माझ्या गाडीला एकाने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे मी तेथे थांबलो होतो. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र, ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या कारवाईत माझे नाव आले असल्याचे एका किर्तनकाराने सांगितले. याची चौकशी केल्यानंतर पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले की, अपघाताच्या ठिकाणी हे किर्तनकार उपस्थित होते. त्यामुळे त्यांचीही चाचणी करण्यात आली. ती चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही खटला दाखल नाही. मात्र, रजिस्टरमध्ये नाव आल्याने इतरांप्रमाणे त्यांनाही या शिबिराला उपस्थित राहण्याचा कॉल गेला, असा खुलासा करण्यात आला.















