डी.वाय. पाटीलमधील विद्यार्थी : पाय घसरून पडलेल्या तिघांपैकी एकाला वाचविले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कासारसाई धरण (ता. मुळशी) परिसरात फिरण्यासाठी आलेल्या दोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला.
शशांक सिन्हा (वय १९), रविकुमार विनोदकुमार (वय १९) असे मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत. ते आकुर्डी येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होते. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास इतर चार मित्रांसमवेत ते फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात आले होते. त्यावेळी ते धरणाच्या पाण्याशेजारी उभे असताना तीनजण पाय घसरून पाण्यात पडले. त्यातील एकाला उर्वरीत मित्रांनी बाहेर काढले.
परंतु, पाणी खोल असल्याने शशांक व रविकुमार हे बुडाले. त्यांना स्थानिक तरुणांनी पाण्याबाहेर काढले असता त्या दोघांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी शिरगाव परदंवडी पोलीस तपास करीत आहेत.














