सायबर पोलिसांत फिर्याद : लष्करी गणवेशातील फोटो, आधार कार्ड पाठवून केला विश्वास संपादन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आर्मीची ऑर्डर असल्याचे सांगून १ रुपया पाठविल्यावर २ रुपये तुम्हाला परत मिळतील, असा बहाणा करुन एका तरुण व्यावसायिकाला आर्मीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तब्बल २ लाख रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी धनकवडीतील एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा फिशचा व्यवसाय आहे. त्यांना एका मोबाईलवरुन फोन आला. आम्ही खडकीमधील लष्कराचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांचे मर्चंटचे अकाऊंट आहे. त्यात अगोदर पैसे पाठवावे लागतात. त्यानंतर तुमची ऑर्डर पोहचल्यावर दुप्पट पैसे मिळतात. तुम्ही एक रुपया पाठविल्यावर २ रुपये तुम्हाला परत मिळतील, असे सांगितले. फिर्यादीला सायबर चोरट्यांनी लष्करी गणवेशातील फोटो, आधार कार्ड पाठविले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला क्युआर कोड पाठवून तो स्कॅन करायला लावला. त्यावरुन त्यांनी १९ हजार, ३१ हजार, ४९ हजार ९९५ आणि ९९ हजार ९९९ असे सर्व मिळून १ लाख ९९ हजार ९९४ रुपये ऑनलाईन पद्धतीने पाठविले. मात्र त्यानंतर त्यांना पैसे परत करण्यात आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करीत आहेत.
