हडपसर पोलिसांत फिर्याद : हडपसर पीएमपी आगाराच्या गेटजवळ झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर चोरट्यांनी मोटारसायकलची डिकी उचकटून चार लाख रुपयांवर डल्ला मारला. हडपसर-गाडीतळ येथील पीएमपी आगाराच्या गेटजवळ ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.
अरुण जाधव (वय ३५, रा. त्रिवेणीनगर, फुरसुंगी, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीने रामटेकडी-हडपसर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतून चार लाख रुपये काढून मोटारसायकलच्या डिकीमध्ये ठेवले. डिकी लॉक करून मोटारसायकलवरून घरी जात असताना कामानिमित्त थांबले आणि पीएमपी डेपोच्या गेटसमोर दुचाकी पार्क करून लॉक केली आणि मित्राबरोबर हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले. त्यानंतर गाडीजवळ आले असता डिकीचे लॉक उचकटून चोरट्याने चार लाख रुपये चोरून नेल्याचे निदर्शनास आले. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
