वारजे पोलिसांची कारवाई : पुण्यात तलवार नाचवत ‘भाई’ची थेट पोलिसालाच धमकी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तलवार नाचवत परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाची कॉलर पकडून, त्यास तलवारीने फडशा पाडण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. वारजे-रामनगरमध्ये हा प्रकार घडला. एवढेच नाही तर मी रामनगरचा भाई असून, पोलिसांना घाबरत नाही, असे म्हणून गुन्हेगाराने थेट पोलिसांनाच आव्हान दिले. याप्रकरणी पोलिसांनी ‘भाई’ला बेड्या ठोकल्या आहेत.
धनंजय बबन बोराणे (वय – 34 रा. म्हसोबा टेकडी, रामनगर) याला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी महेश बोयने यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी धनंजय बोराणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुरुवारी (दि.3) रात्री बाराच्या सुमारास तो हातात तलवार घेऊन रामनगर येथील म्हसोबा टेकडी येथे दहशत निर्माण करत असल्याचे पोलीस कर्मचारी महेश बोयने यांना दिसले.
महेश बोयने हे आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्याने त्यांची कॉलर पकडली. ‘मी पोलिसांना घाबरत नाही. मी रामनगरचा भाई आहे. तु जर मला पकडले तर याच तलवारीने मी तुझा फडशा पाडीन’ अशी धमकी आरोपीने महेश बोयने यांना दिली. तसेच धक्का मारुन खाली पाडून पळून जाऊ लागला. यावेळी त्याठिकाणी हजर असलेल्या इतर पोलिसांनी बोराणे याचा पाठलाग करुन पकडले. पोलिसांनी पकडल्यानंतर देखील आरोपी शिवीगाळ करत होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पार्वे करीत आहेत.
