पुणे स्टेशनजवळ पकडले : गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक-१ची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांना चार महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१ने बेड्या ठोकल्या. पुणे स्टेशनजवळील अलंकार थिएटरसमोर सोमवारी (दि.14) ही कारवाई केली.
नवनाथ गोविंद अडागळे (वय-35 रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१चे पोलीस अधिकारी कर्मचारी फरार, तडीपार व इतर गुन्ह्यातील आरोपींचा शोघ घेत होते. त्यावेळी येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी नवनाथ अडागळे अलंकार थिएटरसमोर उभा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी गुन्हा केल्यानंतर फरार झाला होता. आरोपीला येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१चे गजानन टोम्पे, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस अंमलदार गणेश पाटोळ, अक्षय गायकवाड यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.















