कोथरुड पोलिसांत फिर्याद : पौड रोड-कोथरूडमधील पीएमपी बसथांब्यासमोर झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव अज्ञात वाहनाची ज्येष्ठ महिलेला धडक बसल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पौडरोड-कोथरूड येथील खुशबू चौकातील पीएमपी बसथांब्यासमोरील रस्त्यावर १४ मार्च २०२२ रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला.
मीना सुरेश गोळे (वय ६५, रा. सुतारचाळ, कोथरूड, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वैशाली मेंगडे (वय ४४, रा. केळेवाडी, कोथरूड, पुणे) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची आई पौड रोड-कोथरूड येथील पीएमपी बसथांब्यासमोरील रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाची धडक बसली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चैतन्य काटकर पुढील तपास करीत आहेत.

 
			

















