मनोज लोहिया : ऑपरेशन परिवर्तनअंतर्गत मुळेगाव तांडाचा चेहरामोहराच बदलला
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : हातभट्टी दारू उत्पादित करणाऱ्या मुळेगाव तांडा (जि. सोलापूर) महिलांनी परिवर्तन घडविले. त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे, असे स्पष्ट मत कोल्हापूर परिक्षेत्रचे मनोज लोहिया यांनी व्यक्त केले.
ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत मुळेगाव तांडा (जि. सोलापूर) परिवर्तन उद्योग समूहाचे नामकरण करीत व्यवसायाचे उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्रचे मनोज लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहायक जिल्हाधिकारी मनिषा आवळे, पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा, तहसीलदार अमोल कुंभार उपस्थित होते.
मनोज लोहिया म्हणाले की, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तनअंतर्गत मुळेगाव तांडा गाव दत्तक घेतले. जिल्हा उद्योग केंद्र व मिटकॉनच्या माध्यमातून मुळेगाव तांडा येथील ४१ महिलांना मशिन ऑपरेटर व फॅश डिझायनिंगचे २४ दिवस प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणानंतर स्वतःच्या गावात उद्योग उभा करून परिवर्तनाची नांदी सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. हाच धागा पकडून सातपुते यांनी महिलांना गार्मेंट व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले. त्यातून अत्याधुनिक पद्धतीच्या १८ शिलाई मशीन खरेदी करून दिल्या. या व्यवसायात मुळेगाव तांडा येथील महिलांनी परिवर्तन उद्योग समूह असे नामकरण करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी बालाजी अमाईन्सच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या पाठीमागील पडिक हॉल दुरुस्त करून दिला आहे. गावचा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चेहरामोहराच बदलून टाकला आहे. ऑपरेशन परिवर्तन उपक्रमातून हातभट्टी दारू उत्पादित करणाऱ्या महिलांना स्वतःचा गार्मेंट व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले, त्याचबरोबर जागा उपलब्ध करून दिली, असे त्यांनी स्पष्ट केले.
