विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : धानोरीतील मारहाण प्रकरणी २०-२५ जणांवर गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : धानोरीतील लक्ष्मीनगरमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असून, २०-२५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धानोरीतील मुख्य रस्त्यावर मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी राजूराम रूपाराम चौधरी आणि नरेश चौधरी यांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रकाश महादेव कुंभार (वय ४८, रा. करिश्मी सोसायटी, वडगाव बु. पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिव परांडे (वय ५५ रा. धानोरी), मंगेश साळुंखे (वय ३२), राजूराम रूपाराम चौधरी (वय ४४), नरेश चौधरी (वय १९) यांच्यासह २०-२५ जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुणे महापालिकेकडून धानोरी येथील लक्ष्मीनगरमधील मुख्य रस्त्यालगत खासगी मिळकतीच्या फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. तसेच 20 ते 25 जणांच्या जमावाने अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी यांच्यावर हल्ला करत त्यांना हाताने बेदम मारहाण केली. तर इतर जमावाने जेसीबीवर दगड फेक करुन आरडाओरडा करुन आरोपींनी फिर्यादी हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत.
