कोंढवा पोलिसांत फिर्याद : महिलेसह दोघांविरूध्द गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेचा टॅक्स लावून देतो, असे सांगून एका गोदाम मालकाकडून वेळोवेळी ३ लाख ६५ हजार ८५० रुपये घेऊन त्यांना पालिकेची बनावट टॅक्स पावती देऊन फसवणूक करणाऱ्यावर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट ते ऑक्टोंबर २०२१ दरम्यान पार्श्वनगर, कोंढवा, गोकुळ हॉटेल येथे घडला आहे.
प्रविण डांगी (वय ३५, रा. सुखसागर नगर, कात्रज) आणि आराधना मोरे (वय ३५, रा. साईनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विजय ध्यानचंद वालिया (वय ५६, रा. पार्श्वनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचे कोंढवा बुद्रुक येथे कारपेट गोडाऊन आहे. त्या गोडाऊनला पुणे महापालिकेचा टॅक्स लावून देतो, असे सांगून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. दोघांनी मिळून टॅक्स लावण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ३ लाख ६५ हजार ८५० रुपये घेऊन त्यांना पुणे महापालिकेची खोटी टॅक्स पावती देऊन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक खेतमाळ तपास करीत आहेत.
