लष्कर पोलिसांत फिर्याद : ऑनलाइन खरेदीमध्ये फसवणुकीचे नवनवे फंड्यातून सामान्यांना गंडा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन खरेदीमध्ये मागिल आठवड्यात कपड्याऐवजी चिंध्या पाठविल्या. त्यानंतर आता चक्क लष्करी अधिकाऱ्याला १२ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्यावर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गु्न्हा दाखल केला आहे.
प्रमोदकुमार सिंग (वय ४३, रा. लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सिंग यांनी ऑनलाईन पद्धतीने उत्पादन विक्री करणाऱ्या एका संकेतस्थळावरुन काही उत्पादने खरेदी केली. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी सिंग यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी घरपोच वस्तू पोहचवण्याची बतावणी सिंग यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांना एनीडेस्क रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. सिंग यांनी अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरली. चोरट्यांनी सिंग यांच्या बँक खात्यातून 12 हजार 198 रुपये परस्पर काढून घेतले. हा प्रकार सिंग यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे प्रियंका शेळके करीत आहेत.
