सहकारनगर पोलिसांची कामगिरी : पद्मावती बसथांब्याजवळ घडली होती घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पादचारी महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचे गंठन चोरून नेणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. पद्मावती बसथांब्याजवळ १० मे २०२२ रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली होती.
रोहित संजय मगदूम (वय २८, रा. शुभम प्लाझा बिल्डिंग, कात्रज, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मांगडेवाडी-कात्रज येथील ३० वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पद्मावती बसथांब्यावरून उतरून पायी जात होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन चोरून नेले. फिर्यादी महिलेने आरडाओरडा केला. मात्र, चोरट्याने संधी साधून पळ काढला. सहकारनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे पुढील तपास करीत आहेत.
