वारजे पोलिसांत फिर्याद : बीएसएनएलच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून केली फसवणूक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बीएसएनएलच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एक लाख ९९ हजार ५७० रुपयांची फसवणूक करणाऱ्यावर वारजे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.
याप्रकरणी प्रकाश अशोक सिंगारे (वय ६९, रा. अरिस्टा, साई सयाजीनगरजवळ, वारजे) यांनी वारजे-माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाईल वापरकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीला अज्ञात मोबाईलधारकाने बीएसएनएल कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही एनीडेस्क रिमोट हे ॲप डाऊनलोड करा व त्याद्वारे फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट कार्डची माहिती घेऊन त्यांची वेगवेगळ्या ट्रान्झेक्शनद्वारे एक लाख ९९ हजार ५७० रुपयांचा इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली. झोन-३च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड आणि सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे-माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) डी. जी. बागवे करीत आहेत. नागरिकांनी कोणाही अनोळखी व्यक्तीला ओटीपी किंवा बँकेची माहिती एसएमएसद्वारे देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
