महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : कुर्डूवाडी रस्त्यावर हायवे स्टॉप येथे रात्री पावणेआठ वाजता बार्शी शहर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या दरम्यान एमएच 14 पासिंग असलेली एक मारूती इको ही काळ्या रंगाची त्यावर पिवळे पट्टे असलेली गाडी होती. गाडीच्या मालकाकडे चौकशी केली असताना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी गाडीची झडती घेतली. त्यामध्ये दरोडा घालण्याचे साहित्य आढळून आले. दरोडा घालण्याच्या उद्देशाने कटावण्या, तलवार, ॲडजस्टेबल पाना, स्क्रू डायव्हर, पक्कड, कटर, पटटी पाने, हातमोजे, मास्क, कानटोप्या, जर्किन, मिरची पावडर इत्यादी साहित्य गाडीत भरल्याचे दिसून आले.
तेव्हा पोलिसांनी गाडीसह दोन जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावे आकाश महावीर काळे, वय 20 वर्षे, धंदा, राहाणार रमा माता कॉलनी, माळीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर, किशोर ज्ञानदेव माने, वय 37 वर्षे धंदा मजूरी, राहाणार- राउतनगर, अकलूज, ता. माळषिरस अशी आहेत तर महादेव रंगनाथ पवार, रा. सवतगाव, ता. माळशिरस, विनोद तानाजी काळे, रा. सवतगाव, ता. माळशिरस, सुरेश नामदेव चव्हाण रा. सवतगाव, ता. माळशिरस आणि दिलीप मोहन पवार, रा पांडूझरी, कर्नाटक हे चौघे फरार झाले. आरोपींविरूद्ध बार्शी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोकॉ. अजित महादेव वाघमारे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, पुढील तपास उपनिरिक्षक गजानन कर्णेवाड करत आहेत.
पो.नि. संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. अजित महादेव वाघमारे, शरद दत्तू साळवी, राहुल राजाराम उदार, कुमार सर्जेराव माने यांनी ही कामगिरी पार पाडली.
सांगली दरोडा प्रकरणी लावली होती नाकाबंदी
सांगली येथील दरोडा प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी बार्शी शहर पोलिसांनी बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावर नाकाबंदी लावली होती.
