आईला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या मुलीला ज्येष्ठ नागरिक आणि पोलिसांचा मदतीचा हात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुंढवा परिसरात आईच्या शोधात बाहेर पडलेल्या सात वर्षीय मुलीला परिसरातील ज्येष्ठ नागरिकाने मदत करत, मुंढवा पोलिसांच्या हवाली केले. पांडुरंग गायकवाड यांनी महिला अंमलदार हेमलता गावडे यांच्या जवळ सुपूर्द केले. त्यानंतर, बऱ्याच तपासाअंती तिचे पालक आई नवरतन, वडील तेजराम सोनकर यांच्या ताब्यात देण्यात आले.
सात वर्षीय राधिकाचे आईवडील मजुरी करतात. पाच जून रोजी आई-वडील रात्री उशिरापर्यंत कामावरून न आल्याने अस्वस्थ झालेली राधिका त्यांच्या शोधात घराबाहेर पडली होती. ज्येष्ठ नागरिक असलेल्या पांडुरंग गायकवाड यांनी अस्वस्थ मुलीला पाहिले तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ते तिला मुंढवा पोलिस ठाण्यात घेऊन आले. अंमलदार हेमलता गावडे यांनी प्रेमाने तिची विचारपूस केली, मात्र तिला घराचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगता आला नाही. तेव्हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्यासमोर नेल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत, तिच्या पालकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या मुलीसह गायकवाड यांच्या मदतीने पालकांचा शोध घेतला. चौकशी नंतर एबीसी रोड इथे तिचे घर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एक दीड तास शोध घेतल्यानंतर या मुलीचे पालक सापडले.
सदर कारवाई पुणे शहर परिमंडळ 5 चे पोलिस उप आयुक्त विक्रांत देशमुख, हडपसर विभाग सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या सुचनेनुसार पोलिस अंमलदार हेमलता गावडे आणि संदीप गर्जे यांनी केली.