महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हडपसर येथील सोनार गल्ली येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तुपे सभागृहाजवळ बसलेल्या सहा व्यक्तिंना गुन्हे शाखा युनिट 5 च्या तपास पथकाने अटक केली. गुन्ह्यांना आळा बसावा यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधक पेट्रोलिंग केले जाते.
यामध्ये युनिट पाच च्या पथकाला खबर मिळाल्यानुसार माळवाडी रस्त्यालगतच्या तुपे सभागृहाजवळच्या मोकळ्या जागेत फिरत असलेल्या संशयास्पद व्यक्तींना अटक करण्यात आले.
दुकानात घुसून लुटमार करण्याच्या उद्देशाने सज्ज असलेल्या गणेश लोंढे, वय 23, रा. महमंदवाडी, पुणे, निरंजन ननवरे, वय 19 रा. पंढरपूर, माऊली लोंढे, वय 21, हडपसर यांना ताब्यात घेतले, तर अन्य काही जण पळून गेले. पकडलेल्या इसमांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडून दहा हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात कोयते, लाल मिरची पावडर, नायलॉन दोरी आदी साधने जप्त करण्यात आली. अधिक चौकशी अंती सोनार गल्लीतील सोन्याचे दुकान बंद होताना चोरी करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांच्याकडे सापडलेला मोबाईल हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींचा पुर्वेइतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा असून वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत.
वरील कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलीस आयुक्त अमोल झेंडे, पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस उप-निरीक्षक अविनाश लाहोटे, पोलिस अंमलदार शहाजी काळे, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, अमित कांबळे यांच्या पथकाने पार पाडली.