महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुंढवा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात बलात्काराची कायदेशीर तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 2016 साली घडली होती.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अभिनय साही याला भारतीय दंड विधान कलम 376 2जे नुसार 10 वर्ष सश्रम कारावास व 10 हजार रूपये आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.
फिर्यादीने 28 फेब्रुवारी 2016 रोजी बलात्काराची फिर्याद दाखल केली होती. अभिनय साही, आनंद प्रल्हाद, देवथ दुबे, अभिजीत देवराय, दिपानशू गुप्ता, तनुश्री जग्गी यांच्या विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. घार्गे सध्या पोलिस निरीक्षक, तत्कालीन पोलिस अंमलदार राजेंद्र जगताप (सेवानिवृत्त), राहुल मुळे (सध्या नेमणूक पोलिस मुख्यालय) यांनी मिळून तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जानमोहम्मद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली केला होता. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दाखल गुन्ह्यातल्या आरोपी विरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध करून माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
या तक्रारीवर पुण्यातल्या शिवाजीनगर सत्र न्यायालयाने सुनावणी करून गुन्ह्यातल्या पुराव्यांची खातरजमा केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे, शिवाजीनगर न्यायालय, पुणे यांनी दाखल गुन्ह्यातला मुख्य आरोपी अभिनय साही याला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 235 (5) नुसार दोषी ठरवत त्याला 10 वर्ष सश्रम कारावास व रूपये 10 हजार दंड ठोठावण्यात आला.
या गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान, परिमंडळ पाच चे पोलिस उपआयुक्त विक्रांत देशमुख, हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, मुंढवा पोलिस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कुलाळ, सरकारी अभियोक्ता रमेश घोरपडे, पोलिस अंमलदार आनंद यादव, गंगाधर छत्तीसे यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशांची वेळोवेळी पूर्तता केली.