महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : शहर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना गुन्हे प्रकटीकरण शाखेस माहितीच्या आधारे चोरीच्या दोन मोटरसायकलसह दोन आरोपींना ताब्यात घेतले. प्रथमेश सुरेश उर्फे प्रताप पवार व सचिन रोहिदास डोकडे (दोघे रा. तपणेश्वर गल्ली, जामखेड, जिल्हा नगर) यांना अटक करण्यात आली. या दोघांकडेही नोंदणीक्रमांक नसलेल्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.
४ जुलै ला सुमारास ताडसौंदणे ते बार्शी रस्त्याने दोन इसम चोरीच्या मोटरसायकल घेऊन जाणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सदर आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी गाड्या वेगाने पळवल्या. पोलिसांनी पाठलाग करून या दोघा आरोपींना ताब्यात घेतले. दोघांकडेही बिगर नंबरच्या गाड्या होत्या. गाडीसह पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्या चोरीच्या असल्याचे स्पष्ट झाले. पुण्यातल्या डेक्कन पोलिस चौकीमध्ये गाडीच्या चोरीचा गुन्हा दाखल असल्याचेही निष्पन्न झाले.या दोन्ही मोटरसायकलची किंमत 70 हजार असून या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलिस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, बार्शी शहर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस फौजदार अजित वरपे, पोलिस हेड कॉन्स्टेबल शैलेश चौगुले, पोलिस नाईक अमोल माने, पोलिस नाईक मनीष पवार, पोलिस नाईक वैभव ठेंगल, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर धोंगडे, पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी, पोलिस कॉन्स्टेबल रविकांत लगदिवे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश पवार, पोलिस कॉन्स्टेबल अंकुश जाधव यांनी पार पाडली. वाहन खरेदी करताना कागदपत्रांची खात्री केल्याशिवाय वाहन खरेदी करू नये असे आवाहन बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना केले आहे.