सहकारनगर पोलिसांची कारवाई : बेकायदा पिस्टल बाळगणार्या सराईत गुन्हेगारास अटक
महाराष्ट्र ३६० न्यूज :
अरण्येश्वर येथील आण्णाभाऊ साठे नगर परिसरातील रिक्षा स्टॅण्डजवळ थांबलेल्या सराईत गुन्हेगारांला सापळा रचून पकडताच त्याच्याकडून पिस्तुल आणि दोन काडतूसं हस्तगत करण्यात आली.
सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे आदेशाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व त्यांचे सहकारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना त्यांच्या बातमीदाराने माहिती दिली. अरण्येश्वर परिसरातील आण्णाभाऊ साठे नगर येथील रिक्षा स्टॅण्डजवळ एक व्यक्ती संशयास्पद थांबला आहे. तो कंबरेला पिस्तुल सारखे हत्यार लावुन फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक व तपास पथकाने सापळा रचून अनिल सुधाकर भोमकर (वय 53, रा. शिवदर्शन, पुणे) याला अटक करून त्याच्याकडील देशी हात बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे असा 30,800 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशन येथे बेकायदा पिस्टल बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.
अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधिर घाडगे, बापु खुटवड, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, सागर सुतकर, महेश मंडलिक, महादेव नाळे, सागर शिंदे, शिवलाल शिंदे व प्रदिप बेडीस्कर यांनी ही कारवाई केली.
