गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कामगिरी : मोस्ट वाँटेड आरोपींना शिताफीने पकडले
महाराष्ट्र ३६० न्यूज
पुणे : बेकायदा लोखंडी कोयता बाळगणाऱ्या आरोपीसह गंभीर गुन्ह्यातील दोन मोस्ट वाँटेड आरोपींना अटक करण्यात पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे.
खंडणीविरोधी पथक एकचे सहायक पोलिस निरिक्षक बुवा, सहायक पोलिस फौजदार वांजळे, रमेश चौधर, दुर्योधन गुरव व अमर पवार हे गस्तीवर असताना नाना पेठ येथील होम हॉस्पिटलसमोर संशयितपणे फिरणाऱ्यास ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने आपले नाव प्रदीप ऊर्फ बाबा आनंद गवळी (वय ३२, रा. राजेवाडी, नाना पेठ, पुणे) असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पाठीमागे एक लोखंडी कोयता मिळाला. या आरोपीविरुद्ध समर्थ पोलिस स्टेशन येथे बेकायदा धारदार शस्त्र जवळ बाळगल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आणखी एका घटनेत, खंडणीविरोधी पथक एककडील पोलीस हवालदार संजय भापकर व पोलीस शिपाई प्रफुल्ल चव्हाण यांना भारती विदयापीठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार हवा असलेला आरोपी प्रसाद ऊर्फ मक्या शेषेराव सातपुते (वय १९, रा. आंबेगाव पठार, धनकवडी, पुणे, मूळ गाव अंबाजोगाई, बीड) हा कात्रज येथील शानिनगर परीसरातील पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळताच, त्यास सापळा रचून पकडून पुढील तपासकामी भारती विदयापीठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर, खंडणी विरोधी पथक एककडील पोलीस अंमलदार विजय कांबळे व पोलिस शिपाई हनुमंत कांदे यांना मुंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपी विशाल ऊर्फ गोरख सोनावणे हा जांभुळवाडी रोड, शनिनगर मंदिरासमोर, कात्रज, पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती समजल्यानंतर त्यास त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पुढील तपासकामी मुंढवा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस आयुक्त संदीप बुवा, पोलीस अंमलदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओबासे, संजय भापकर, रवींद्र फुलपगारे, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, विजय कांबळे, अमर पवार, हनुमंत कांदे, पिराजी बेले यांनी केली आहे.
