लिओ क्लब ऑफ बार्शीचा उपक्रम : रक्षाबंधन निमित्त महिलांमध्ये जागृती
महाराष्ट्र ३६० न्यूज
बार्शी : रक्षा बंधनच्या पार्श्वभूमीवर लिओ क्लब बार्शी टाऊनच्या वतीने महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिन, व्हेडींग मशिन व इन्सिनरेटर (डिस्पोझल) मशिन वाटप करण्यात आले.
तरूणींमध्ये सॅनिटरी पॅड वापर व डिस्पोझल बद्दल जनजागृती होण्यासाठी बार्शीच्या लिओ क्लबने हा सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी नर्सिंगचे प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थींनीकडून याबाबत महिला आरोग्य विषयक जागृती करण्यासाठी लघु नाटिका सादर करण्यात आली. यामाध्यमातून महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक करताना डॉ.यादव यांनी लिओ क्लबच्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. लिओ अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ म्हणाले रक्षाबंधन हा उत्सव भाऊ-बहिण यांच्यातील पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. व भावाने बहिणीचे रक्षण करावे या भूमिकेतुन आम्ही आरोग्य विषयक लिओ क्लबच्या वतीने सॅनिटरी व्हेडींग मशिन व डिस्पोझल मशीन भेट देत आहोत. दैनंदिन वापराच्या दृष्टीने या मशिन सहज सुलभ व कमी खर्चाच्या आहेत त्याचा उपयोग महिला व तरूणींनी करावा असे आवाहन केले .
यावेळी संस्थाध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, खजिनदार जयकुमार शितोळे, कर्मवीर नर्सिंग कॉलेज बार्शीच्या प्राचार्या सुरेखा डांगरे, हॉस्टेल अधिक्षक संजोती जाधव, लिओ क्लब बार्शीचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ,सचिव आदित्य सोनिग्रा, सायली श्रीश्रीमाळ, व सिमरन लाड उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा बैरागी व श्रुतिका फावडे यांनी तर आभार प्राचार्य डांगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लिओ क्लब बार्शीचे उपाध्यक्ष यश मेहता व सदस्य शुभम लाड, गौरव डेडीया यांनी परिश्रम घेतले. दरम्यान राखी पौर्णिमे निमित्त विद्यार्थींनीनी क्लबच्या सदस्यांना राखी बांधण्यात आली. यावेळी क्लबच्या सदस्यांनी तरूणी व महिलांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली.
सॅनिटरी व्हेडींग मशिन ही स्वयंचलीत असून डिस्प्लेची आहे त्यामुळे या मशिनला इलेक्ट्रॉनिक सप्लायची गरज आहे. या मशिनमध्ये फक्त पाच रूपयाचे नाणे टाकून सहजपणे सॅनिटरी पॅड घेता येते. एका वेळी तीस सॅनिटरी पॅड या मशिनव्दारे मिळू शकतात. पॅडचे रिफिलींग वगळता या मशिनला कोणताही खर्च येत नाही. तर पॅड डिस्पोझेबल मशिन ही इलेक्ट्रॉनिक असून या मशिनमध्ये एका वेळी वापरलेले तीन सॅनिटरी पँड जाळले जाऊ शकतात.
