महाराष्ट्र ३६० न्यूज
पहिले लग्न झाले असताना ते लपवून ठेवून तरुणीबरोबर प्रेमाचे नाटक करुन तिची फसवणूक केली. पहिल्या लग्नाची माहिती मिळाल्यावर प्रियकर व त्याच्या आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुरसुंगीमध्ये १७ ऑगस्ट रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
नितीन दत्तात्रय कांबळे (वय २३, रा. पानमळा, वडकी, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मनीषा गोविंद गायकवाड (वय २२, रा. फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, नितीन कांबळे याचे पूर्वी लग्न झाले होते. हे त्याने मनीषा गायकवाड हिच्यापासून लपवून ठेवून तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले. त्याची नितीन कांबळे याच्या आईवडिलांना माहिती होती. असे असताना त्यांनी त्याबाबत कधीही फिर्यादी यांना कळविले नाही. काही दिवसांपूर्वी नितीनचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मनीषा हिला झाली. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला. तिने नितीनला याचा जाब विचारण्यासाठी मेसेज केले. त्यानंतर त्याने व त्याच्या आईवडिलांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्या त्रासाला कंटाळून मनीषा हिने 17 ऑगस्ट रोजी एक चिठ्ठी लिहून घरातील पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. अकस्मात मृत्युचा तपास करत असताना हा सर्व प्रकार उघड झाला. नितीन व त्याच्या आईवडिलांच्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन नितीन कांबळे याला अटक केली आहे.
