बॉम्बे सन्स ट्रेडर्सच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल : मुंबईतील बीएमसी सप्लायर्स कंपनीच्या नावाचा वापर
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बीएमसी मुंबई येथे सप्लायर्सची ऑर्डर मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल २२ लाख ४४ हजार २२१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते २३ जून २०२१ दरम्यान ऋतुराज सोसायटी, बंधू प्रेम, पुणे-सातारा रोड येथे घडला. याप्रकरणी बॉम्बे सन्स ट्रेडर्सचे मालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीचा कपड्याचा व्यवसाय होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये थांबल्याने त्यांनी कपड्याचे सप्लायर्स रबाना टेक्सचे मालक यांच्याबरोबर इतर व्यवसाय सुरू करण्याबाबत चर्चा केली. कोरोना प्रतिबंधक उत्पादने सॅनिटायझर, पीपीई किट, फेसशिल्ड, इंफ्रारेड थर्मामीटर, मास्क, हँडग्लोज आदी वस्तूंच्या व्यवसायात फायदा मिळेल, त्यासाठी मुंबईतील सप्लायर्सची ऑर्डर मिळविता येईल, असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीला बॉम्बे सन्स ट्रेडर्सचे मालकांशी संपर्क साधण्यास सांगितले.
दरम्यान, फिर्यादीने त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ‘बीएमसी’मध्ये कोरोना प्रतिबंधक प्रॉडक्ट्स सप्लायर्सचे वार्षिक दोन-तीन कोटींची उलाढाल असून, गव्हर्नमेंट सप्लायर्सची ऑर्डर मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी मोबाईलवरून सॅम्पल मालाची मागणी करून ३८ हजार ३८० रुपयांचा माल, तसेच वेळोवेळी बँक खात्यामध्ये २२ लाख पाच हजार ९०१ रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगून असे एकूण २२ लाख ४४ हजार २२१ रुपयांची फसवणूक केली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढमढेरे पुढील तपास करीत आहेत.