बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : एकूण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
मोपेडला अडकवलेली लॅपटॉपची बॅग चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यास अवघ्या १२ तासांत अटक करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश मिळाले असून, या प्रकरणी एकूण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीतील महेश सोसायटी चौक येथे फिर्यादी हे त्यांच्याकडील होंडा ॲक्टिवा मोपेड दुचाकी गाडीचेमध्ये लॅपटॉपची बॅग अडकवून ठेवून सदरची मोपेड गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून त्यांचे राहत्या सोसायटीचे गेट उघडत असताना अज्ञात चोरट्याने हातचलाखीने सदर लॅपटॉप असलेली बॅग चोरी केली. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर येथे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी केलेल्या सूचनेप्रमाणे बिबवेवाडी पोलीस ठाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी राजेश उसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सतीश मोरे व तानाजी सागर यांनी घटनास्थळावरील व इतर ठिकाणचे तब्बल २० ते २५ सीसीटीव्ही कॅमे-यांची पाहणी करून अरोपीचे वर्णन प्राप्त करून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी इम्रान माईद्दीन शेख (वय २०, रा. अप्पर, बिबवेवाडी, पुणे) यास अप्पर इंदिरानगर भागातून सापळा रचून शिताफीने पकडून १२ तासांच्या आत अटक करण्यात आली.
सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला डेल कंपनीचा लॅपटॉप व गुन्ह्यात वापरलेली होंडा ॲक्टिवा मोपेड गाडी असा एकूण ६०,००० रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, पोलीस अंमलदार अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे आणि राहुल शेलार यांनी केली आहे.