खंडणी पथकाची कारवाई- बुधवार पेठेतील घटना, शरीराचे तुकडे पिरंगुट आणि मुठा घाटात फेकले
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. मयत रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी ही महिला बेपत्ता झाली होती. याची तक्रार फरासखाना पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस महिलेचा शोध घेत असताना महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने अटक केली असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती.
हनुमंत अशोक शिंदे (वय ४० रा. 277, बुधवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी हनुमंत आणि मयत रोजिना रियाज पानसरे यांचे विवाह बाह्य अनैतिक संबंध होते. त्याने रोजिनाचा खून करुन तिच्या शरीराचे तुकडे करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून दिल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली. या दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादातून आरोपीने महिलेचा 10 तारखेला गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर दोन दिवसांनी मृत शरीराचे तुकडे करुन दोन वेगवेगळ्या सिलपॅक बॅगेत भरले. या दोन बॅगापैकी एक बॅग पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिराजवळ 50 फूट खोल घाटात फेकून दिली. तर दुसरी बॅग लवासा रोडवरील उरावडे आंबेगाव परिसरात मुठा घाटात फेकून दिली. आरोपीने महिलेचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले हत्यार भूगाव येथील मानस लेक तलावात फेकून दिले. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा शिताफीने शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन पिरंगुट आणि मुठा घाटातून कुजलेल्या अवस्थेत मृतदेहाचे भाग ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांसोबत फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, पोलीस हवालदार मधुकर तुपसौंदर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपुत, अतुल साठे, पोलीस नाईक नितीन कांबळे, रमेश चौधर, अमोल आवाड, दुर्योधन गुरव, गजानन सोनवलकर, राजेंद्र लांडगे, विवेद जाधव, नितीन रावळ, विजय कांबळे, पोलीस शिपाई प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, पिराजी बेले, हनुमंत कांदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
