रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केल्या रिक्षा : कलम २८३ अन्वये एकाच दिवशी गुन्हे दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : वाहतुकीस अडथळा होईल व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशारीतीने रस्त्यात रिक्षा उभी करणाऱ्या सात रिक्षाचालकांविरोधात कलम २८३ अन्वये शहर पोलिस ठाण्यात एकाच दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील रिक्षाचालकांविरोधात अशाप्रकारे करण्यात आलेली ही पहिलीच धडक कारवाई असून, त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये खळबळ माजली आहे. नूतन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी आपल्या स्वागत समारंभात बार्शीकरांना शिस्त लावणार, असा निर्धार व्यक्त केला होता, त्याची ही सुरुवात मानली जात आहे.
बार्शी शहरातील वाहतुकीच्या बेशिस्तीमध्ये रिक्षाचालक सर्वांत अग्रभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास राजकीय दबाव येतो, असा पोलिसांचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांना शिस्त लावण्याच्या कोणी भानगडीत पडले नाही. मात्र, शेळके यांनी कोणासही न जुमानता रिक्षाचालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये गणेश ज्योतीराम यादव (रा. सुभाषनगर, बार्शी), परशुराम शिवाजी जाधव (रा. अलिपुर रस्ता, बार्शी), अनिल श्रीधर मुकटे (रा. सुभाषनगर, बार्शी), पांडुरंग सुभाष समिंदर (रा. बारबोले वस्ती, कासारवाडी रस्ता, बार्शी), किरण दौलत मोर (रा. सौंदरे, सध्या रा. नाळे प्लॉट, बार्शी), चंद्रकांत मल्लिकार्जुन कंबीरे, (रा. सोलापूर रस्ता, मुळे प्लॉट, बार्शी), मारुती काशीनाथ पौळ (रा. सुभाषनगर, जयशंकर
मिल समोर, बार्शी) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
