शासकीय समितीचा स्पष्ट अहवाल : ‘आयएमए’ डॉ. अंधारे यांच्या पाठीशी
बार्शी :पवन श्रीश्रीमाळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सुश्रुत हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. संजय अंधारे यांनी कोविड साथीच्या आपत्तीकाळातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच कोविडग्रस्तांवर उपचार केले आहेत, असा स्पष्ट अहवाल या संदर्भात नियुक्त शासकीय समितीने दिला आहे.
डॉ. अंधारे यांच्यासारख्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पाठीशी आयएमए संघटना आहे, असे प्रतिपादन ‘आयएमए’चे राज्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी ज्येष्ठ शल्यकर्मी डॉ. बी. वाय. यादव, संघटनेचे गर्भलिंग निदान प्रतिबंधक चाचणी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष कुलकर्णी, विख्यात फिजिशियन डॉ. संजय अंधारे, आयएमएचे स्थानिक अध्यक्ष डॉ. प्रशांत मोहिरे, सचिव डॉ. विवेकानंद जानराव आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. लोंढे म्हणाले, कोरोनाकाळात रुग्णांवर प्रतिबंधात्मक यशस्वी उपचार करणाऱ्या राज्यातील पाच डॉक्टरांना तज्ज्ञ समितीमार्फत परीक्षण करून राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात येणार आहे. या डॉक्टरांमध्ये बार्शीच्या डॉ. अंधारे यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोविड रुग्णांसाठी सर्वप्रथम डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेणाऱ्या डॉ. अंधारे यांच्या योगदानाची दखल राज्य शासनानेही घेण्याची गरज आहे. या वेळी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी तिसऱ्या लाटेची तीव्रता वाढू नये, यासाठी शासकीय व खाजगी वैद्यकीय यंत्रणेच्या चांगल्या समन्वयाची गरज आहे, असे सांगितले.
यावेळी डॉ. अंधारे म्हणाले की, सर्वच डॉक्टर हे रुग्णांना व्याधिमुक्त करण्यासाठीच काम करत असतात. कोविड काळात जीव धोक्यात घालून माझ्यासह सुश्रुतच्या सर्व कर्मचारीवृंदाने काम केले आहे. रुग्णांवर सर्वतोपरी दर्जेदार उपचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कोविडबाबत रुग्णांच्या सर्वप्रकारच्या माहितीचे संकलन दररोज नियमितपणे जिल्हा प्रशासनाकडे पाठविले जाते. सुश्रुत हॉस्पिटलमधील मृत्युदर हा सरासरी शेकडा एक टक्के इतका कमी आहे. सदर रुग्णाविषयी मला पूर्ण सहानुभूती आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी गैरसमजूतीमधून माझ्याविरोधात उघडलेली मोहीम मनाला वेदना देणारी आहे.
यावेळी डॉ. यादव म्हणाले, कोविड काळात राज्यात उपचार करणाऱ्या शंभरपेक्षा अधिक डॉक्टरांचेही मृत्यू झाले आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांशी डॉक्टरांनी संवाद ठेवून सातत्याने रुग्णाच्या प्रकृतीमधील चढउताराबाबत अवगत केले पाहिजेत. हा मुद्दा जागतिक पातळीवर डब्ल्यूएचओच्या व्यासपीठावरही चर्चिला गेला आहे. कोविड काळात उपचार करताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना आयएमएतर्फे दिली जाणारी दहा लाखांची मदत स्तुत्य आणि गरजेची आहे.
















