पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना लोणीकंद पोलिसांकडून तासाभरात अटक करण्यात आली असून, ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्यात आले आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय अनिल कवडे (वय २५, रा. कवडे वस्ती, वाघोली) हा २४ ऑगस्ट रोजी रात्रौ अकराच्या सुमारास कावडे वस्ती वाघोली येथे माया हॉटेलजवळ मोकळ्या जागेत त्याचा मित्र गणेश जाधव यांच्यासह गप्पा मारत बसला असताना, तेथे संतोष ऊर्फ गट्टया आव्हाळे (रा. आव्हाळवाडी ता. हवेली जि. पुणे) आणि त्याचा मित्र आचारी (पूर्ण नाव माहीत नाही) हे त्यांच्या मोटारसायकलीवरून तेथे आले. “तू गट्टया आव्हाळेला नडतोस काय? तुला खल्लासच करून टाकतो,” असे म्हणून त्या दोघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत कोयत्याने फिर्यादीचे डोक्यावर, दोन्ही हातांवर वार केले. त्याच वेळी गट्टया आव्हाळेचा मित्र शैलेश बिडवे (पूर्ण नाव माहीत नाही) हा तेथे आला व त्याने “अक्षय यास सोडू नका” असे म्हणत त्याच्या जवळील कोयत्याने वार करून फिर्यादीस गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच आरोपींनी त्याच्याजवळील कोयते हातात धरून हात वर करून मोठमोठयाने आरडाओरडा करीत “अक्षय यास कोण वाचवायला येते तेच पाहू” असे म्हणत दहशत निर्माण केली.
याबाबत २६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला. यातील आरोपीची लोणीकंद पोलीस स्टेशन तपास पथकाचे स्टाफ माहिती काढत असता तपास पथकाचे पोलीस नाईक कैलास सांळुके आणि विनायक साळवे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी शैलेश बिडवे व त्याचा साथीदार हे आबा चायनीज सेंटर वाघोली येथे थांबलेले आहेत. या माहितीचे आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सूरज किरण गोरे आणि स्टाफ यांनी सदर मिळालेले बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी शैलेश बिडवे आणि त्याच्या साथीदारास पोलीस अमंलदार समीर पिलाणे यांनी ओळखल्याने तपास पथकाच्या स्टाफने मिळून दोघांना पकडले.
आरोपींची नावे शैलेश उत्तरेश्वर बिडवे (वय ३५, रा. साई सत्यम पार्क, उबाळेनगर, वाघोली) आणि किशोर चंद्रकांत व्हडले ऊर्फ आचारी (वय २७, रा. खांदवेनगर, ता. हवेली, जि पुणे) अशी असून, त्यांच्याकडील चौकशीत त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यांना लागलीच सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर करून ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही, अप्पर पोलीस आयुक्त चव्हाण, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, सहायक फौजदार मोहन वाळके, पोलीस नाईक अजित फरांदे, कैलास साळुंके, विनायक साळवे, जाधव, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, बाळासाहेब तनपुरे यांनी केलेली आहे.















