मुंढव्यातील तीन हॉटेलमधून खंडणी उकळल्याचा आरोप
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
मुंढवा भागातील तीन हॉटेलमधून सात हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी हा आदेश दिला. बुधवारी रात्री त्याला उशीर अटक करण्यात आली होती.
मिलन कुरकुटे असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कुरकुटे हा हिंजवडी पोलिस ठाण्यात नियुक्तीला होता. गेल्या २१ ऑगस्टपासून तो वैद्यकीय कारणावरून रजेवर होता. मंगळवारी तो रात्री १० वाजण्याच्या सुमारास कुरकुटे आपल्या चारचाकी गाडीतून गणवेशात मुंढव्यातील हॉटेल लोकल गॅसस्ट्रो ॲन्ड बार येथे गेला. ताबडतोब हॉटेल बंद करा. नाही तर मी तुमच्या हॉटेलवर कारवाई करीन, असे हॉटेलचे व्यवस्थापक मारुती गोरे यांना बजावले. त्यावेळी गोरे यांनी त्याला आमच्या हॉटेलमध्ये कोणीही ग्राहक नसल्याचे सांगितले. त्यावर कुरकुटे याने गोरे याला सांगितले की, मी आयुक्तालयातून आलो आहे. तुमचे हॉटेल चालू होते. त्यामुळे कारवाई होवू द्यायची नसेल तर मला दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून जबरदस्तीने २ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने हॉटेल वन लॉन्जमध्ये जाऊन दोन हजार रुपयांची खंडणी घेतली.
दोन्ही ठिकाणी खंडणी घेतल्यानंतर कुरकुटे याने एबीसी रस्त्यावरील हॉटेल कॉनिव्हल गाठले. ते हॉटेल बंद असताना मॅनेजर किशोर थापा याला हॉटेल उघडण्यास भाग पाडून त्याच्यावर कारवाईची धमकी देऊन तीन हजार रुपयांची खंडणी जबरदस्तीने घेतली, असे तक्रारीत नमूद आहे. अटक झाल्यानंतर कुरकुटे याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्यांला न्यायालयाने जामीन मंजूर केला. कुरकुटे याने ॲड. अमेय डांगे यांच्यामार्फेत जामीनासाठी अर्ज केला होता. पोलिस उपनिरीक्षक एच. एस. गिरी अधिक तपास करीत आहेत.















