4 घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास :अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे शहरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केले आहे. मागिल काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी बंद घरामध्ये घरफोडी करुन कोटीच्या आसपास ऐवज लंपास केला आहे. पुणे शहरात चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात असून या घटनांमध्ये चोरट्यांनी 2 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
पहिली घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. धनकवडी येथील श्रीहरी सोसायटीत राहणारे राजेंद्र अंबादास चकोले (वय-65) यांच्या बंगल्याचे लोखंडी चॅनलगेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 9 ग्रॅम सोने, 600 ग्रॅम चांदीच्या वस्तू, रोख रक्कम असा एकूण 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.25) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला. राजेंद्र चकोले यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून चोरट्यांनी 1 लाख 46 हजार 220 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वैभव वसंतराव पहाडे (वय-38 रा. लेन नं. 6/2, संतनगर, लोहगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वैभव हे 1 ऑगस्ट रोजी घराला कुलूप लावून मुळ गावी गेले होते. यासंधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील 40 ग्रॅम सोन्याच्या वस्तू, 45 ग्रॅम चांदी व रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी (दि.24) दुपारी दोनच्या सुमारास ते घरी आले असता घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. विमानतळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तिसरी घटना खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, चोरट्यांनी जेनरिक मेडीकलमध्ये चोरी करुन 29 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. श्रीराम रामदास पाटील (वय-45 रा. प्रतिकनगर, येरवडा) यांनी खडकी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पाटील यांचे खडकी बाजार येथे खडकी जेनरिक मेडिको शॉप आहे. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील मोबाईल आणि रोख रक्कम चोरुन नेली. खडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चौथ्या घटनेत चोरट्यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेल्या 55 हजार रुपयांच्या रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. ही घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि.26) सकाळी पावणे दहाच्या सुमारास उघडकीस आली असून, शैलेंद्र रामप्रसाद भोसले
(वय-35 रा. धायरी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे गोडाऊनचे शटर अज्ञात चोरट्याने उचकटून गोडावूनमध्ये असलेल्या कपाटाच्या ड्रॉवरमधील 55 हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोराट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















