पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
वकील असल्याची बतावणी करून १३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन देतो असे सांगून बनावट कागदपत्रे बनवून एका बांधकाम व्यावसायिकाची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अमित दत्तात्रय घुले (वय ४२, रा. मांजरी बु़ ता. हवेली) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रसन्न शिरुडकर (वय ४१) आणि शर्वरी प्रसन्न शिरुडकर (वय ४०, दोघे रा. अॅड्रसेस सोसायटी, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित घुले हे त्यांच्या ओळखीच्या अॅड. पठाण यांच्याकडे गेले असताना तेथे शर्वरी शिरुडकर व प्रसन्न शिरुडकर यांची फिर्यादीशी ओळख झाली. त्यांनी आम्ही वकील असल्याचे सांगून त्यांच्याशी ओळख वाढविली.
तुमचे दस्तऐवज रजिस्ट्रेशन करुन देतो, असे सांगितले. ते वकील नसताना फिर्यादी यांच्या मांजरी बु़ येथील शारदा कॉम्प्लेक्स व शारदा सुमन आर्केड या बिल्डिंगमधील १३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून सात बारा उतारा, ८ अ उतारा अशी कागदपत्रे तसेच फ्लॅट विक्रीचे मुळ दस्त घेऊन ७ फ्लॅटचे १८ मे व १९ मे २०२१ या दोन दिवसात दापोडी येथील दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक २५ येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीचे कागदपत्रे बनवून त्यांचा वापर करुन रजिस्ट्रेशन करुन फिर्यादी यांची १३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तपास करीत आहेत.
