तिघांवर गुन्हा : गाड्याची तोडफोड करुन जबरदस्तीने उकळली खंडणी
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
स्वत:ला भाई म्हणून घेणार्या गुंडाने त्याच्या साथीदारांसह सणसवाडी येथील एका बिअर बारमध्ये जाऊन तोडफोड करीत गल्ल्यातील १५ हजार रुपये जबरदस्तीने घेत खंडणी उकळली. दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी विजय नारायण दरेकर, वैभव व त्यांचा एक साथीदार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी संतोष मारुती दरेकर (वय ३८, रा. सणसवाडी गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. संतोष दरेकर यांचे सणसवाडी येथील एमआयडीसीमध्ये हर्षल बिअर बार व परमीट रुम हे हॉटेल आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजता ते हॉटेलमध्ये असताना विजय दरेकर त्याच्या दोन साथीदारासह लोखंडी रॉड घेऊन आला. त्याने काऊंटरवर बसलेल्या संतोष दरेकर यांना ”मी इथला भाई आहे. माझ्या रस्त्यात कोणी यायचे नाही. मला आडवा आला तर एकेएकाला खलास करीन, सत्या तुझी तर इथच विकेट टाकीन, मापात रहायचं” असे म्हणून विजय याने दहशत माजवित संतोष यांच्या हातावर रॉडने मारले.
ते पळून जाऊ लागल्यावर त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रॉड हुकविला. तेव्हा त्यांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. हॉटेलच्या काऊंटरचे ड्रॉवर उघडून त्यातील १५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. संतोष यांची हॉटेलच्या बाहेर टोयोटा कार उभी होती. हॉटेलमधून परत जाताना वैभव याने ”ही सत्याची गाडी आहे, हिला फोडून टाकू, त्या सत्यालाही फोडू” असे म्हणून कारच्या दोन्ही बाजूच्या काचा रॉडने फोडल्या व बुलेटवरुन ते निघून गेले. शिक्रापूर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़.
