शुक्रवार पेठेतील पानघंटी चौकात घडला प्रकार
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचे अॅकप म्हणून लोकप्रिय ठरलेल्या बायजू थिंग अँड लर्न लिमिटेड या कंपनीच्या नावाने तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील पानघंटी चौकात १० ऑक्टोबर २०२० रोजी घडला होता.
याप्रकरणी निखील वसंत कदम (वय ३५, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश आनंद माने (रा. गोपाळनगर, वरळी, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलांना ऑनलाईन शिक्षण देणारे अॅाप थिंग अँड लर्न या कंपनीने बायजुस या नावाने काढले आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. मुळची ही कंपनी बंगलोरची आहे. असे असताना आरोपीने फिर्यादी यांना पश्चिम बंगाल येथे बायजुस थिंग अँड लर्न ही कंपनी असून त्या कंपनीमध्ये १ कोटी रुपये गुंतवणुक केल्यास कंपनी १ कोटी ३० लाख रुपये देते असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपीला १ कोटी रुपये रोख दिले. त्यानंतर आता वर्ष होत आले तरी ही रक्कम परत न केल्याने निखिल कदम यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फसवणूकीची तक्रार दिली आहे.
