खडक पोलिसांत गुन्हा : शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी आवारात घडला प्रकार
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुण्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या मुद्देमाल खोलीच्या छताचे कौले काढून 27 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार 13 जून 2021 ते 15 जुलै 2021 या कालावधीत शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी आवारात घडला आहे.
ग्रामीण पोलीस दलातील हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिलीप तुकाराम गायकवाड (वय-56) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी आवारातील एका खोलीत जुने हवेली पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यात आला आहे. चोरट्यांनी मुद्देमाल खोलीच्या छताचे कौले काढून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी खोलीतून अल्युमिनियम पट्ट्या, तांब्याची तार, गॅस सिलेंडर, अॅल्युमिनीअम लाद्या असा एकूण 27 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब सावंत करीत आहेत.
